Tuesday, June 23, 2020

शकुंतला


'अभिज्ञानशाकुंतल' हे नाटक ' भूतो भविष्यति' या वाक्याचे सुंदर उदाहरण आहे. ज्यामधून शकुंतला नामाची अनुपम नायिका आपल्यासमोर मांडण्यात आली आहे. अलौकिकरुपसंपन्न, अगणित गुणांची खाण, अमर अशा प्रेमाचे मूर्तीरूप शकुंतला ही भारतीय स्त्रियांचा आदर्श मानली जाते. महर्षी विश्वामित्रांच्या मेनका नावाच्या अप्सरेच्या मधुर मिलनाने जन्माला आलेल्या शकुंतलेचे पालनपोषण कण्वमुनींनी केले. आईपासून लाभलेले दिव्य सौंदर्य वडिलांपासून मिळालेले आर्ष तेज, यांनी तिला अप्रतिम सुंदर बनवले होते.

 पहिल्या अंकात कवीने 'मानुषीषु कथं वापर स्यादस्य रूपस्य संभव:'( हे असे स्वर्गसुलभ सौंदर्य मानुषींमध्ये आढळणे कसे संभव आहे)असे दुष्यंताच्या मुखातून शकुंतलेच्या अलौकिक सौंदर्याबद्दल वदविले आहे. 'शुद्धान्तदुर्लभमिदं वपुराश्रमवासिनो मंदिर जनस्य' (आश्रमवासी स्त्रीचे हे सौंदर्य अत्यंत दुर्लभ आहे.)असेही दुष्यंत म्हणतो. तारुण्याच्या कोवळ्या वयात असणाऱ्या शकुंतलेच्या सौंदर्यात कृत्रिमतेचा लवलेशही दिसत नव्हता. 'अव्यजमनोहरवपु:' असे म्हणणाऱ्या कवीने हे स्पष्ट केले आहे. दागिन्यांशिवायच 'निराभरणसुंदरी' असणाऱ्या शकुंतलेच्या रूपाचे वर्णन करणारे हे काव्य खूप प्रसिद्ध आहे-
सरसिजमनुविद्धं शैवलेनापि रम्यं
मलिनमपि हिमांशोर्लक्ष्मलक्ष्मीं तनोति |
इयमधिकमनोज्ञा वल्कलेनापि तन्वी
किमिव हि मधुराणां मण्डनं नाकृतीनाम् ||
'शेवाळ्याने व्यापून असलेले कमळ सुद्धा रमणीय दिसते.चंद्रावरती डाग असले तरी तो सुलक्षणी दिसतो. तसेच ही शकुंतला, वल्कले परिधान करूनही अधिक सुंदर दिसत आहे.  जे जात्याच सुंदर असतात त्यांना कुठल्याही विशेष आभूषणांची गरज नसते.' अशा प्रकारे वर्णन करणाऱ्या कवीने सौंदर्याचे एक नवीनच भाष्य लिहिले आहे.

 शकुंतलेचे बाह्य रूपच नव्हे तर अंतरंग सुद्धा अतिशय सात्विक होते. कण्व मुनींच्या आश्रमाच्या पावन परिसरात वाढलेली ती शकुंतला प्रकृतीच्या सगळ्या कल्याणकारी गुणांना मिळवून परिपूर्ण नारी बनली होती. दया,‌विनय वात्सल्य इत्यादी गुणांनी तिच्या हृदयाचा विकास झाला होता. ऋषींच्या आश्रमातील नियमांना आत्मसात करून, परिसराचे पावित्र्य नेहमी जपत, ती मोठी झाली.

जेव्हा शकुंतलेने ऋषींचा आश्रमामध्ये आलेल्या राजा दुष्यंताला पाहिले तेव्हा तारुण्यसुलभ अशा प्रेमांकुराचा जन्म तिच्या हृदयामध्ये झाला. परंतु हा मनोविकार तपोवनाच्या विरुद्ध आहे याची जाणीव तिला झाली. 'किं नु खल्विदं जनं प्रेक्ष्य तपोवनविरोधिनो विकारस्य गमनीयामस्मि संवृत्ता' (या सुंदर मनुष्याला पाहून तपोवनाच्या विरुद्ध अश्या विकाराचा जन्म माझ्या मनामध्ये कसा बरे झाला आहे?) असे ती स्वतःला समजावू लागली. म्हणूनच बऱ्याच काळापर्यंत तिच्या प्राणप्रिय सखींना, प्रियंवदा आणि अनुसूया यांना देखील तिने स्वतःच्या हृदयातील गुपित सांगण्याचे धैर्य केले नाही. 'बलवान् खलु मे अभिनिवेश: | इदानीमपि सहसैतयोर्न शक्नोमि निवेदयितुम् | (माझे मन जास्तच प्रवृत्त होत आहे, आतादेखील मी कदाचित या दोघींना याविषयी सांगू शकणार नाही) असे शल्य स्वतःच्या मनामध्येच अनुभवत राहिली.

प्रेमामुळे विव्हळ अश्या अवस्थेत सुद्धा शकुंतलेने आत्मसंयम त्यागला नाही. यावरून आर्य स्त्रीची संस्कृती कशी असते हे तिने स्पष्ट केले आहे. मदनाच्या बाणांनी आक्रांत झाली असताना देखील 'पौरव रक्ष विनयम्' (हे नगरवासी, विनयाने वाग) असे म्हणणाऱ्या कण्वांच्या मुलीच्या संयमाला उपमा नाही. पाश्र्चात्य विमर्शक फ्रेजर याने देखील तिच्या गुणांना पाहिले आहे.
-        Eastern, subtle, evasive, throbbing with love veiled with reverse, there yet grows within her a passionate and seething love for the king which she tries to stiffel but from which we can find no peace. The Abhigyan shakuntalam of Kalidas by M R.Kale.)

श्रुतींमध्ये संमत असलेल्या अशा गांधर्व विधीने तिचा विवाह दुष्यांतासोबत झाला. तारुण्यसुलभ अशा भावनांनी तिच्या मनावर आक्रमण केले. त्याच दरम्यान दुर्वास ऋषींच्या सत्कारामध्ये ती कमी पडली. त्यामुळे तिला दुर्वास ऋषी कडून शाप प्राप्त झाला. या प्रसंगाची सृष्टी करून कवीने शकुंतलेची मुग्धता दाखविली आहे, आणि त्याचबरोबर प्रेक्षकांमध्ये किंवा वाचकांमध्ये तिच्याविषयी करूण भाव उत्पन्न केला आहे.

तपोवनामध्ये असणाऱ्या प्राणी पक्षांसोबत, वृक्षलतांसोबत शकुंतलेची उत्तम मैत्री होती. चतुर्थ अंकामध्ये पतीच्या घरी जाण्याच्या वेळी त्या सर्वांचा विरह शकुंतलेला सहन होत नाही म्हणून ती अतिशय दुःखी होते. 'मला केवळ वडिलांचाच विरह सहन करावा लागणार नाही, तर या माझ्या भावंडांवरील प्रेमामुळे यांचादेखील वियोग मला होणार आहे. हा केसर वृक्ष वाऱ्यामुळे हलणाऱ्या आपल्या पल्लव बोटांनी मला लवकर जाण्यास सांगत आहे. जोपर्यंत त्याची समजूत काढीन तोपर्यंत माझेच विस्मरण मला होईल. हे तात, वनज्योत्स्नेला, माझ्या बहिणीला मी एकदा बोलावून येते.' अशा वाक्यांनी कवीने प्रकृती सोबत असणारे तिचे तादात्म्य प्रकाशित केले आहे

शकुंतला ही कश्यप मुलींचे हृदयच होती. शकुंतलेला आपल्या पतीच्या घरी पाठविण्यास तयारी करणाऱ्या मुनींच्या तोंडून कवीने 'यास्यत्यद्य शकुन्तलेति हृदयम्…'असे विलाप करणारे वाक्य घातले आहे. अनसूया आणि प्रियंवदा या सखींबद्दल सुद्धा शकुंतलेला अतिशय प्रेम वाटत होते.

विवाहानंतर एखाद्या सुसंस्कृत गृहिणी मध्ये असणारी लक्षणे शकुंतले मध्ये दिसून येतात. राजाने सर्वांच्या समोर तिचा तिरस्कार केल्यानंतर काही काळ शकुंतला क्रुद्ध झाली. परंतु तिने आपल्या नवऱ्यावरील आदर आणि प्रेम याचा त्याग केला नाही. स्वतःच्या नवऱ्याविषयी प्रेम बाळगून मारीच मुनींच्या आश्रमामध्ये मुनीवृत्तीने ती राहू लागली. सातव्या अंकामध्ये तिला पाहून दुष्यंताने म्हटलेली वाक्ये तिच्या व्यक्तिमत्त्वाचा परिचय आणून देतात. -
'वसने परिधूसरे दधाना….' इत्यादि. 'धूसर अशी वस्त्रे परिधान केलेली, नेहमी म्लानमुखी, एकच वेणी घातलेली, शुद्ध आणि सत्वशील अशी शकुंतला निष्करुण अशा माझे(दुष्यंताचे) जणु दीर्घकालिक विरहव्रत बाळगून आहे.' जेव्हा दुष्यंताला पश्चात्ताप होतो आणि शकुंतलेच्या पाया पडून तो तिची क्षमा मागतो तेव्हा, 'तो आपला प्रतिबंधक वाईट काळ होता'' अश्या सात्त्विक शब्दांनी त्याची समजूत काढते. काश्यप ऋषिंनी म्हटलेल्या 'अस्मान्साधु विचिन्त्य' या श्लोकाचे ती योग्य उदाहरण आहे. चतुर अशा कालिदास नामक शिल्पकाराने निर्मिलेली सर्वांग सुंदर मूर्तीच शकुंतला होती. मी तरी योग्यच म्हटले आहे- 'काव्येषु नाटकं रम्यं तत्र रम्या शकुन्तला'. सर्व काव्यांमध्ये नाटक हे रमणीय असते आणि सर्व नाटकांमध्ये रमणीय ही शकुंतला आहे.

संस्कृतलेख - श्री महाबल भट्ट, गोवा
अनुवाद- कु. योगिता छत्रे, गोवा

No comments:

ನಾರೀವಿಧೇಯರು - ರಾಮ (ಉತ್ತರರಾಮಚರಿತಮ್)

ಭವಭೂತಿಯ ’ಉತ್ತರರಾಮಚರಿತಮ್’ ಕರುಣರಸಪೂರ್ಣವಾದ ನಾಟಕ. ಅದರ ನಾಯಕ ರಾಮ, ನಾಯಿಕೆ ಸೀತೆ. ರಾಮನಿಗೆ ಸೀತೆಯಲ್ಲಿರುವ ನಿರ್ವ್ಯಾಜ ಪ್ರೇಮ  ಈ ನಾಟಕದಲ್ಲಿ ಸುವ್ಯಕ್ತವಾಗಿದೆ. ರ...