Monday, June 22, 2020

कालिदाससाहित्यमध्ये प्रकाशमान स्त्रीरत्ने **‌यक्षपत्नी**

#महाकविकालिदासः  #Kalidas_Icon_of_India

🌼 संस्कृतभारती-कोङ्कणप्रान्त: 🌼

लेखमाला
कालिदाससाहित्यमध्ये प्रकाशमान स्त्रीरत्ने

**‌यक्षपत्नी**

 विप्रलम्भशृङ्गाराच्या परमोत्कृष्टकाव्यांमधील अग्रगण्य  असे 'मेघदूतम्' हे कुविकुलगुरु कालिदासाची अनुपम कृती होय . या काव्याची नायिका यक्षपत्नी अथवा यक्षी ही कालिदासाची एक कल्पनामूर्ती. जरी  यक्षीबद्दल प्रत्यक्ष सन्निवेश या काव्यामध्ये नाही तरीही यक्षाच्या मुखातून तिथे जे वर्णन आले आहे त्यावरून तिची मूर्ती आपल्या डोळ्यांसमोर स्पष्ट होते.
 जेव्हा शापामुळे यक्षाचा महिमा म्लान झाला होता आणि तो रामगिरीच्या आश्रमामध्ये वास करत होता, तसेच तो आपल्या प्रियेच्या विरहामुळे विह्वल झाला होता, तेव्हा त्याची भार्या देखील अलकानगरीमध्ये विरह संतापाने द्रवित झालेली असते. आपल्या पत्नीच्या स्वभावाबद्दल जाणून असलेला यक्ष तिच्या होऊ घातलेल्या दशेबद्दल मेघाला सांगता झाला.
 मेघाला तिची ओळख सहजपणे पटू देत यासाठी यक्ष आधी स्वतःच्या पत्नीच्या रूपाचे वर्णन करतो.

तन्वी श्यामा शिखरदशना पक्वबिम्बाधरोष्ठी
मध्ये क्षामा चकितहरिणीप्रेक्षणा निम्ननाभिः।
श्रोणीभारादलसगमना स्तोकनम्रा स्तनाभ्यां
वा तत्र स्याद्युवतिविषये सृष्टिराद्येव धातुः॥

 कृश असे शरीर, श्याम वर्ण सुंदरशी दंतपंक्ती, पक्व फळच असावे असे लालचुटूक ओठ, कृश कंबर, हरणाप्रमाणे नेत्र, गंभीर अशी नाभी, सभार नितंब, मंद पदनिक्षेप आणि भारयुक्त स्तन अशा सौंदर्य लक्षणांनी युक्त या ही सृष्टी कर्त्याची सर्वप्रथम सृष्टी आहे असे वर्णन कवी करतो. यक्ष श्यामलतांमधे तिचे अंग, हरणांच्या नेत्रांमध्ये तिची दृष्टी, चंद्रामधे तिचा चेहरा, मोरपिसांमधे तिचे केस व नदीच्या लाटांमधे तिच्या भुवयांच्या लीला शोधतो. परंतु "हन्तैकस्थं क्वचिदपि न ते चण्डि सादृश्यमस्ति" असे म्हणून जवळपास तिचे सादृश्य कुठेही न दिसल्यामुळे विलाप करतो.
 असे  सुंदर रूप असलेली यक्षी तुषारांनी पिडीत झालेल्या कमळाप्रमाणे विरहा मुळे हतप्रभा झाली असेल अशी कल्पना यक्ष करतो. हरिणाप्रमाणे असलेले तिचे नेत्र सुजले असतील, निश्वासांनी पीडित झालेल्या तिच्या ओठांचा रंग उडाला असेल असे देखील तो म्हणतो.
  यक्षाची पत्नी ललित कलांमध्ये आसक्त असते. ती चित्रे काढते, वीणावादन करते, फुलांची रांगोळी काढते. परंतु आपल्या प्रियकराच्या स्मरणामुळे उत्पन्न झालेले अश्रू बिंदू तिच्या कामांमध्ये विघ्न उत्पन्न करतात. उद्यानामध्ये मंदार-अशोक इत्यादी वृक्षांचे पालन करणे, पोपट- मयूर इत्यादी पक्ष्यांचे लालन करणे हा तिच्या आवडीचा छंद होता.
  जेव्हा यक्ष तिच्यासोबत होता तेव्हा यक्षीचे जीवन शृंगाराने परिपूर्ण आणि सुखमय होते. मंदारादि वृक्षांनी संपन्न अशा वाटिकेमध्ये ती आपल्या प्रियकरासोबत विहार करीत असे. क्रीडापर्वतांवरती त्याच्यासोबत रमान होत असे. जेव्हा शृंगाराचा उद्रेक होत असे तेव्हा स्वतःच्या मुखाने तिने केलेले मदिरा सिंचन आणि डाव्या पदाचा प्रहार कशाला खूप आवडत असे. एके दिवशी तर स्वप्नामध्ये आपल्या पतीला अन्य स्त्रीमधे आसक्त पाहून ती मोठमोठ्याने रडत उठली. अशा प्रसंगी प्रणयकुपितेची तिची समजूत काढण्यासाठी यक्ष तिला हे चण्डी अशी हाक मारत तिच्या पाया पडत असे. प्रेमाने तिचे केस सुद्धा प्रसाधित करत असे.
 शयनाच्या वेळी चंद्राच्या किरणांनी युक्त अशा अनेक रात्री तिने प्रियकरासोबत घालविल्या होत्या. आता तीच हिमांशुकिरणे तिला खूप संताप देऊ लागली. पुन्हा पुन्हा वाहणारे तिचे अश्रू तिची विरहव्यथा वाढवत असत. जेव्हा स्वत:चा नवरा दुसऱ्या देशी जातो तेव्हा भारतीय स्त्रिया आभूषणांचा त्याग करतात. त्याप्रमाणे यक्षीने केशसंस्कार,‌ नखे कापणे, काजळ लावणे, मदिरापान करणे, भुवया सजवणे या गोष्टींचा त्याग करून आर्य नारीचे प्रतिनिधित्व केले.
  पतीच्या दृष्टीरुपी रेखांनी चित्रित केलेले आपल्या पत्नीचे सुंदर चित्र हे कालिदासाच्या कल्पनाविलासाचे उत्तम असे द्योतक आहे. महामहोपाध्याय मल्लिनाथाने खरेच म्हटले आहे-  "माघे मेघे गतं वयः"।

©मूळ संस्कृत लेख - श्री. महाबळ भट्, गोवा.
©अनुवाद - कु. योगिता छत्रे, गोवा.



No comments:

ನಾರೀವಿಧೇಯರು - ರಾಮ (ಉತ್ತರರಾಮಚರಿತಮ್)

ಭವಭೂತಿಯ ’ಉತ್ತರರಾಮಚರಿತಮ್’ ಕರುಣರಸಪೂರ್ಣವಾದ ನಾಟಕ. ಅದರ ನಾಯಕ ರಾಮ, ನಾಯಿಕೆ ಸೀತೆ. ರಾಮನಿಗೆ ಸೀತೆಯಲ್ಲಿರುವ ನಿರ್ವ್ಯಾಜ ಪ್ರೇಮ  ಈ ನಾಟಕದಲ್ಲಿ ಸುವ್ಯಕ್ತವಾಗಿದೆ. ರ...